दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, १० लाखाचा मुद्देमाल जप्त

February 25,2021

नागपूर : २५ फेब्रुवारी - चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून कार आणि 20 देशी दारूच्या पेट्या असा 10 लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. नितीन भाऊराव खडसे (35) दुबेनगर, हुडकेश्वर रोड असे या दारू तस्कराचे नाव आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दारू नेण्यासाठी त्याने एमएच 49 बीबी 7686 क्रमांकाच्या महिन्द्रा कारमध्ये देशी दारूच्या पेट्या भरल्या. युनिट 4 च्या पथकाला ही माहिती समजताच पोलिसांनी त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन नितीनला पकडले. कारची झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 20 पेट्या सापडल्या. पोलिसांनी नितीनला युनिट कार्यालयात आणून त्याची विचारपूस केली असता अमित मसंद आणि त्याचा मित्र राकेश याच्या मदतीने यवतमाळ येथून दारूच्या पेट्या खरेदी केल्या. हा माल रामनगर (चंद्रपूर) येथील बाळू बारसागडे यास देणार होता. 

नितीन हा दारू तस्कर असून नेहमीच तो तस्करी करतो. यापूर्वी त्याला दोनदा पोलिसांनी पकडले होते. त्याच्यावर दारू तस्करीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दारूच्या पेट्या, मोबाईल आणि कार असा 10 लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.