तलावाची दुरावस्था दूर करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सामाजिक कार्य करावे - उच्च न्यायालय

February 25,2021

नागपूर : २५ फेब्रुवारी - शहरातील गांधीसागर तलाव दुरवस्था प्रकरणी याचिकाकर्त्यांनी सामाजिक कार्य करावे. श्रमदान  करून जनजागृती करावी. तसेच महानगरपालिका आयुक्तांना सोबत घेऊन त्याचे सौंदर्यीकरण करावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. शहरातील प्रसिध्द गांधीसागर तलावाची दुरवस्था झाल्याप्रकरणी दोन वकिलांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तुमचे योगदान द्या, तुम्हीच आधी प्रत्यक्ष काम करा व दोन आठवड्यात त्या कामांचा आढावा दाखल करण्याचे आदेश दिले.

अँड. पवन ढिमोले व अँड. सारंग निघोट या वकिलांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. गांधीसागर तलाव व परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचर्यांचे ढीग साचले आहेत. परिसरात कचरा फेकणार्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. तसेच तलावात मोठय़ा प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता करणे व सौंदर्यीकरणात भर घालणे आवश्यक आहे. मात्र, तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, तलावाची दुरवस्था झाली आहे. तसेच हा तलाव सुसाईड पॉईन्ट झाला आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे पीडित व्यक्ती सहज तलावापर्यंत पोहोचतात व पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करतात. त्यामुळे तलावातील आत्महत्यांवर तातडीने आळा बसविण्यासाठी तलावाच्या चारही बाजुला संरक्षण भिंत बांधावी आणि तलाव परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र यावर उच्च न्यायालयाने तुम्हीच आधी प्रत्यक्ष काम करा. गांधीसागर तलावाची साफ सफाई करा, कचर्याचे ढीग साफ करा व जनजागृती करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्या खंडपीठाने दिलेत. याप्रकरणी अँड. कुकडे, अँड. दर्शन सिरस व अँड. राहुल काळकर यांनी कामकाज पाहिले.