पोहरादेवी मंदिरात १९ जणांना कोरोनाची बाधा

February 25,2021

वाशिम : २५ फेब्रुवारी -  काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले होतेय. यावेळी राठोड यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येनं लोक पोहरादेवी येथे जमले होती. राज्यात करोनाचे संकट असताना इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र आल्यामुळं करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता ती शक्यता खरी ठरत असल्याचं चित्र आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना करोनाची बाधा झाली आहे. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण प्रशासन करोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना अशी गर्दी जमवल्यामुळं राठोड यांच्यावर चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत आहे. असं असतानाचा आता पोहरादेवी येथील गर्दीमुळं करोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना करोनाची लागण झाली आहे. कबिरदास यांच्या कुटुंबातील अन्य तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. तर, काही जणांना करोनाची लक्षण जाणवत आहेत. 

कबिरदास महाराजांनी २१ फेब्रुवारी रोजी करोनाची टेस्ट केली होती. मात्र, तरीही संजय राठोड यांचा पोहरादेवी दौरा असताना हजर राहिले. तसंच, राठोड यांच्यासोबतच ते दिवसभर होते.