पिकांच्या आधारभूत किमतीत सरकारने केली ऐतिहासिक वाढ - पंतप्रधान

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सरकारने ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त सांगितले.

ते म्हणाले, की गेल्या सात वर्षांत शेतीमधील बदलांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यात, चांगल्या पाटबंधारे सुविधा, प्रगत तंत्रज्ञान, पीक विमा योजना, मृदा आरोग्यपत्रिका यांचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची भूमिका दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

आपल्या शेतकऱ्यांची जिद्द व कष्टाची ताकद मोठी आहे. आमच्या सरकारने पिकांच्या किमान आधारभूत भावात ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे मोदी म्हणाले. नमो अॅपवर या योजनेतील काही ऐतिहासिक क्षणांची झलक पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी किसान सम्मान योजना दोन वर्षांपूर्वी जाहीर केली होती, त्यात शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये मदत ही तीन हप्त्यांत देण्यात आली. ही मदत छोटय़ा व मध्यम शेतकऱ्यांसाठी होती. त्यातील रक्कम लाभार्थीच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली.

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान या सारख्या राज्यातील शेतकरी संघटनांनी केंद्राने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नवीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचेच हित होणार असून हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत, अशी सरकारची भूमिका आहे.