देशात १ मार्चपासून ६० वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस विनामूल्य दिली जाणार

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केंद्राने केली. त्यात ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार आहे. केंद्राने खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची मुभा दिली असून, तिथे या नागरिकांना सशुल्क लसलाभ घेता येईल.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही मोहीम १० हजार सरकारी रुग्णालये आणि २० हजार खासगी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केले जाणार असून, खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना दोन मात्रांसाठी किती शुल्क द्यावे लागेल, याची माहिती दोन-तीन दिवसांत केंद्रीय आरोग्य मंत्रालय जाहीर करेल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यातील सीरम संस्थेची ‘कोव्हिशिल्ड’ आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना मंजुरी देण्यात आल्यानंतर, लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला. त्याअंतर्गत ३ कोटी करोनायोद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या टप्प्यात आतापर्यंत १.२१ कोटी जणांनी लस घेतली असून, १४ लाख जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस, लष्करी-निमलष्करी जवान, सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १० कोटी लोकांसह २७ कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. नव्या टप्प्यामध्येही ‘को-विन’ अॅपवर नागरिकांना नोंदणी करावी लागेल आणि आधार कार्ड वा निवडणूक ओळखपत्र क्रमांक देणे गरजेचे असेल. नागरिकांना लशीच्या निवडीचे स्वातंत्र्य असेल का, या प्रश्नावर प्रकाश जावडेकर यांनी दोन्ही लशींचा देशाला अभिमान असल्याचे सांगितले.

देशभरात करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या वाढू लागली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी तीनसदस्यीय केंद्रीय पथके पाठविण्यात आली आहेत.