राहुल गांधींच्या वक्तव्यावरून देशभरात वाद, स्वपक्षीयांनीही फटकारले

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे फोडा आणि राज्य करा नितीचा भाग असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही राहुल गांधींना फटकारलं असून मतदारांच्या ज्ञानाचा सन्मान केला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. कपिल सिब्बल यांनी यावेळी राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांनाही उत्तर दिलं असून त्यांचे दावे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाचा एकामागोमाग एक निवडणुकीत पराभव होऊ लागल्यानंतर नेतृत्वावर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “याबद्दल राहुल गांधीच योग्य आणि विस्तृतपणे सांगू शकतील. काँग्रेस फोडा आणि राज्य करा धोरण अवलंबत असल्याचा भाजपाचा आरोप हास्यास्पद आहे”.

“राहुल गांधी काय बोलले आहेत यावर भाष्य करण्यासाठी मी कोणीच नाही. त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि ते कोणत्या संदर्भात होतं हे तेच सांगू शकतील. पण आपण देशातील मतदारांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानाचा अपमान करता कामा नये. कोणाला आणि का मतदान करावं याची त्यांना उत्तम जाण असते,” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेस देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप हास्यास्पद आहे. हे सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून लोकांमध्ये फूट पाडत आहे,” असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.

मंगळवारी राहुल गांधी केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले की, “मी पहिली १५ वर्ष उत्तरेतून खासदार होतो. तिथे मला वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाची सवय लागली होती. केरळमध्ये येणं माझ्यासाठी स्फूर्ती देणारं होतं कारण येथे आल्यानंतर अचानक मला लोकांना मुद्द्यांमध्ये रस असल्याचं लक्षात आलं आणि तेदेखील फक्त वरवरच्या मुद्द्यांवर नाही. येथील राजकारणात बुद्धिमत्ता आहे”.