गोडसे समर्थक नेत्याने घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश

February 25,2021

भोपाळ : २५ फेब्रुवारी - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेणाऱ्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.

मध्य प्रदेश काँग्रेसने बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरला शेअर केले आहेत. बाबुलाल चौरसिया यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत जिंकली होती.

काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे हे सांगण्याच प्रयत्न केला आहे. “याआधी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. आमचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं आहे. गांधी कुटुंब किती मोठ्या मनाचं आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे आज गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे,” असं ग्वालियरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी म्हटलं आहे.

बाबुलाल चौरसिया यांनी गोडसेला श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसंच काँग्रेसमध्ये आपण याआधीही होतो, त्यामुळे आपण कुटुंबात पुन्हा परतलो असल्याचं म्हटलं आहे.

भाजपाने यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. ग्वालियर-चंबलमध्ये पालिका निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने काँग्रेसचे प्रयत्न सुरु असल्याचं भाजपा प्रवक्ते राहुल कोठारी यांनी म्हटलं आहे. “कमलनाथ यांनी शिवराज सिंग चौहाना यांना तुम्ही महात्मा गांधींसोबत आहात की नथुराम गोडसेसोबत अशी विचारणा केली होती, आता कमलनाथ यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

बाबुलाल चौरसिया २०१९ मध्ये चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी नथुराम गोडसेचं कोर्टातील शेवटचं वक्तव्य आपण एक लाख लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं जाहीर केलं होतं.