आता नरेंद्र मोदी सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटू लागले आहेत - संजय राऊत

February 25,2021

मुंबई : २५ फेब्रुवारी - अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले आहे. त्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली आहे. 'आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले' आहेत, असा उपरोधिक निशाणा राऊत यांनी मोदींवर साधला आहे.

अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा उद्घाटन सोहळा बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला. या मैदानाचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम असे होते. मात्र आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाणार आहे. यावरून आता विरोधक भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे राऊत यांनीही टीकास्त्र सोडले आहे.

नाव बदलणे हा गुजरात सरकारचा निर्णय आहे, आपण त्याबाबत काय करु शकतो. गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मान्यता दिली असेल. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारचे निर्णय झाले असतील तर मला माहिती नाही. पण आता मला नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.