गोंदियात ४० वर्ष जुनी अतिक्रमणे तोडली

February 25,2021

गोंदिया : २५ फेब्रुवारी - गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळासमोर अतिक्रमित घरांवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. मागील ४० वर्षांपासून २२ कुटुंबांनी अतिक्रमण करत या ठिकाणी आपले संसार थाटले होते. मात्र कोरोना सारख्या महामारीच्या काळात रोजगार उपलब्ध होत नसताना या २२ कुटुंबातील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली, त्यामुळे प्रशासनाने आमची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी या रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तंबू ठोकत ठिय्या दिला आहे.

बिरसी विमानतळासमोर मागील ४० वर्षा पासून हे २२ कुटुंब अतिक्रमण करून रहात असून दोन वर्षा आधी म्हणजे २०१८ ला बिरसी विमानतळ प्राधिकरणाने यांच्या करिता सावर्जनिक शौचालयाची निर्मिती करून दिली होती. मात्र विमानतळ प्राधिकरणाने याच लोकांच्या घरावर बुलडोझर चालवून त्याची घरे जमीनीदोस्त केली आहेत. तर अनेक लोकांना त्याचे साहित्य देखील घरा बाहेर काढू दिले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार त्यांच्या डोळ्यादेखत मातीमोल झाले आहेत.

या कारवाईपूर्वी काही रहिवाशांनी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना देखील विमान प्राधिकरणाने या अतिक्रमित घरांवर बुलडोझर चालवला आहे. परिणामी या कुटुंबांवर आता भटकंतीची वेळ आली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने संचारबंदीची पाऊल उचलली आहेत. अशा परिस्थितीत बेघर होण्याची वेळ आल्याने हे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

ही कुटुंबे मागील ४० वर्षा पासून या ठिकाणी राहत असून ग्रामपंचायतीला कर देखील देतात. मात्र आज नियमाप्रमाणे कर देऊन सुद्धा त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आल्याने त्यांनी ग्रामपंचयातीपुढेच तंबू ठोकून ठिय्या मांडला आहे. तसेच येत्या दोन दिवसात ग्रामपंचायतीमार्फत या लोकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही तर ग्रामपंचायतीला टाळे ठोकू असा पवित्रा या अतिक्रमण बाधित कुटुंबीयांनी घेतला आहे.