जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या मोझेक पोट्रेटची गिनीज बुकात नोंद

February 25,2021

जळगाव : २५ फेब्रुवारी - जळगाव येथील जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. मोजेक प्रकारातील या भव्य पोर्ट्रेटची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनी नोंद घेऊन भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. या कलाकृतीचे आज (गुरुवारी) लोकार्पण होणार आहे.

जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जळगावातील जैन व्हॅली परिसरातील 'भाऊंची सृष्टी' येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फुटावर भवरलाल जैन यांची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग ९८ तासात साकार झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेतली. ही कलाकृती कायमस्वरुपी स्थापित करण्यात आली असून भाऊंच्या सृष्टीतील ‘

भाऊंच्या वाटिकेत ती प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

काळा, करडा, पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला, त्या पाईप्सपासून मोजेक स्वरुपात ही कलाकृती साकार केली आहे. या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास असे एकूण ९८ तास अर्थात पाच हजार ८८० मिनिट, ३ तीन लाख ५२ हजार ८०० सेकंदात या मोजेक स्वरुपाची कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात, अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडिओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोर्ट्रेटची सुद्धा घेण्यात आली. या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी कोरोनामुळे ही पूर्ण कलाकृती ऑनलाईन पाहिली. त्यानंतर स्वप्नील डांगरीकर यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.