रुग्णालयावर धाड टाकून विनापरवाना औषधसाठा केला जप्त

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - चंद्रपूर शहरातील एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली आहे. त्याठिकाणी लाखो रुपयांचा विनापरवाना औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

कोरोना काळात जीवनावश्यक औषधांचा साठा नियंत्रित रहावा यासाठी चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने विविध रुग्णालयांची अचानक तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असलेल्या या तपासणी दरम्यान शहरातील एकोरी वार्डात असलेल्या डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अन्न औषध प्रशासनाचे पथक पोहोचले. या रुग्णालयाची तपासणी केली जात असताना संगणकातील नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आल्याने पथकाने रुग्णालयाची कसून तपासणी केली. त्यावेळी रुग्णालयाच्या तळघरात साठवून ठेवलेला विनापरवाना औषधसाठा आढळला. या विनापरवाना साठवून ठेवलेल्या औषधात 4 हजार झोपेच्या गोळ्यांचा समावेश आहे. 

विटॅमिन गोळ्यांसह अन्य औषधांचा देखील मोठा साठा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने मानवटकर रूग्णालयाविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. विनापरवाना औषधे साठवणे, तो साठा सुस्थितीत नसणे, यासह अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित विविध कलमान्वये ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, कोरोना काळात अन्य कोणत्याही औषध आस्थापनांनी अशा पद्धतीने बेकायदेशीर साठा साठवू नये, असे आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.