पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस तपास योग्य दिशेने - पोलीस महासंचालक

February 25,2021

नागपूर : २५ फेब्रुवारी -  पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण  हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे  यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते गुरुवारी नागपूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. या तपासाविषयी मला सर्व गोष्टी जाहीर करता येणार नाहीत. मात्र, पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. पोलिसांचा तपास हा तथ्यावर चालतो. जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास चालत नाही, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरुन तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले.

भाजप नेत्या चित्रा वाघ गुरुवारी पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाची प्रगती पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वरिष्ठ PI दीपक लगड यांनी मग्रुरी दाखवल्याचा आरोप वाघ यांनी केला. यावर भाष्य करताना हेमंत नगराळे यांनी हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. आज पुण्यात काय घडले मला ते माहीत नाही. मात्र, प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

संजय राठोड हे राज्यभरात फिरतात. मात्र, पोलिसांना ते दिसत नाहीत. संजय राठोड हे पाच-साडेपाच फुटांचे असतीलच. परंतु, वाशिम आणि पुणे पोलिसांच्या ते एकदाही दृष्टीस पडले नाहीत. ते पोलिसांना न दिसायला काय मिस्टर इंडिया आहेत का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण राहात होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत. दरम्यान, यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.