वर्ध्यात भाजीबाजाराला लागली आग, १६ दुकाने जळून खाक

February 28,2021

वर्धा : २८ फेब्रुवारी - वर्धा शहराचे हृदयस्थान असलेल्या गोलबाजारील टिळक मार्केटमध्ये लागलेल्या आगीत भाजी आणि फळ विक्रीचे जवळपास १६ दुकाने जळून खाक झाले. ही आग आज २८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास लागली. वर्धा नगरपालिका आणि भुगाव येथील उत्तमच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या भाजी बाजारात नगर पालिकेने भाजी आणि फळ विक्रीत्याना 126 ओटे उपलब्ध करून दिले. उर्वरित ओट्यांवर १५ -२० वर्षांपासून भाजी आणि फळ विक्री सुरू आहे. आज सकाळी नगरपालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्याना आग लागल्याचे दिसून आले. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. दरम्यान, आगीने रौद्ररूप घेऊन एकामागे एक भाजीचे दुकान कवेत घेतले.

यात प्रफुल भोयर, प्रमोद भोयर, अशोक भोवरे,बबन ठाकरे, राजेंद्र खेकडे, गजू राडे, रवींद्र वैद्य, सूरज लोणकर,वअस्लम बेग, अन्सार, मनोज गुप्ता,वगुळणे अमोल देशब्रातर यांची दुकान जळाली. दुकानात भाजी सह टीव्ही, कुलर, इन्व्हर्टर आदी साहित्य जळाले. आगीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नपचे मुख्याधिकारी बिपिन पालीवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, ठाणेदार बंदीवार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खा. "रामदास तडस यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हा भाजी बाजार नवीन बांधण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी नगर पालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याने टिळक बाजाराचे बांधकाम होऊ शकले नाही, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी बिपीन पालीवाल यांनी दिली.