भद्रावती आयुध निर्माणी परिसरात बिबट मृतावस्थेत सापडला

February 28,2021

चंद्रपूर : २८ फेब्रुवारी - भद्रावती  तालुक्यातील आयुध निर्माणी परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट्याच्या शरिरावर आढळलेल्या जखमावरून दोन बिबट्याच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

आयुध निर्माणी डीएससी परिसरात बिबट, अस्वल, वाघ यांचा वावर आहे. याच परिसरात पाईपमध्ये बिबट मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट मादी जातीचा असून, त्याचे वय बारा महिने आहे.

 मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याच्या शरिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या जखमांवरून झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला असला तरी हा घातपात तर नाही ना, याबाबत वनविभाग तपास करीत आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षापूर्वी जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बिबट व दोन अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती.घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोलचरवार, पशुधन विकास अधिकारी एकता शेडमाके, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. राठोड, विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, भद्रावतीचे क्षेत्र सहायक एन. व्ही. हनवते व कर्मचारी उपस्थित होते.