गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन इसमांना केले जेरबंद

February 28,2021

यवतमाळ : २८ फेब्रुवारी - मराठवाड्यातील हिमायतनगर येथून गुटख्याची तस्करी करणार्या २ इसमांना जेरबंद करून त्यांच्याकडील अवैध गुटखा व दोन मोटरसायकल असा एकूण २ लाख ४३ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तालुक्यातील चालगणी येथे करण्यात आली व शहरातील एका गोदामावर धाड टाकून ४१ हजार ५८ रुपयांचा सुंगधित तंबाखु जप्त करण्यात आला. असा एकूण २ लाख ८४ हजार ६५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

दोन्ही कारवाया उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथकाने केल्यात. या कारवाईमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्य प्रणाली वर प्रश्व चिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या कारवाईत भुजंग कदम रा. रुई ता. हदगाव व पांडुरंग वच्छेवार रा. भानेगांव ता. हदगाव यांना पोलीसांनी जेरबंद केले तर हिमायतनगर येथील अवैध गुटखा व्यापारी अब्दुल मलीक अब्दुल हनिफ यांचेवर कारवाई करण्यात आली. दुसर्या घटनेत विजय भोकरेच्या गोदामावर छापा टाकुन सुंगधित तंबाखु जप्त करण्यात आला. मराठवाड्यातील गुटखा तस्करीचे माहेरघर असलेल्या हिमायतनगर येथून भुजंग कदम व पांडुरंग वच्छेवार हे दोघे मोटर सायकलने अवैद्य गुटखा आणत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना खबर्या मार्फत मिळाली . त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन गुटखा तस्करांना गुटख्या सह जेरबंद करण्यात आले.