दोन ट्रकमधून कत्तलीसाठी जाणाऱ्या ४२ गोवंशाची केली सुटका

February 28,2021

यवतमाळ : २८ फेब्रुवारी - विदर्भामध्ये गो तस्करीकरिता कुख्यात  असलेल्या कळंब शहरामध्ये नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार अजित राठोड यांनी दोन दहाचाकी ट्रक पकडून कत्तलीसाठी जाणार्या 42 गोवंशाची सुटका केली. यावेळी 40 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक राजू साळवे यांना कामठीवरून दोन ट्रक गोवंश हैदराबाद येथे घेऊन कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहिती आधारे त्यांनी अशोका वाईन बारजवळ रात्री सापळा रचला. रात्री 12.45 वाजता नागपूर कडून येणारे दोन मोठे ट्रक अडवून झडती घेतली असता त्यात 42 बैल निर्दयतेने बांधलेले आढळून आले. त्यापैकी काही बैलांना मोठ्या प्रमाणात मार लागलेला दिसून आला. 

या कारवाईत राजू इरपाते, सचिन ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक मावस्कर, गायवाटे, सचिन ठाकरे व कडूकर यांचा सहभाग होता. या कारवाईत पोलिसांनी 5 लाखाहून अधिक गोवंश व 35 लाखांच्या दोन ट्रकांसह 10 हजार रुपये रोख व इतर साहित्य जप्त केले. 

यावेळी पोलिसांनी ट्रक क‘मांक एमएच40 डीएल3762 आणि एमएच40 एन6112 या ट्रकसह आरोपी तारीख कमाल रिजवान अहमद (वय 36, वारीसपुरा, कामठी), जमील खान कादिर खान (वय 23, टोमॅटिक चौक, समशेर तरबेजनगर), आदिलखान आरिफ खान (वय 29, बौद्धविहारजवळ कामठी), शाहिद खान युसुफ खान (वय 28, इस्लामपुरा कामठी) यांना अटक केली.