कालच्या अघोषित लॉक डाऊनमुळे नागपुरात ३०० कोटीची उलाढाल ठप्प

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊननंतर अनलॉकच्या दिशेने वाटचाल होत असताना पुन्हा कोरोनाने तोंडवर काढल्यामुळे शहराची वाटचाल पूर्वपदावर होत आहे. शहरात बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नियमात कठोरता आणण्यात आली असून, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापार, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, शनिवारी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, या एकाच दिवशी जवळपास २५0 ते ३00 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आजदेखील कडकडीत बंद असणार आहे. यामुळे मोठय़ाप्रमाणात आर्थिक व्यवहार थांबणार आहेत. 

महापालिकेने पुढील आदेशापर्यंत शनिवारी आणि रविवारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. शनिवारी इतवारी, महाल, गांधीबाग, कळमना, जरीपटक्यासह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सकाळपासून शुकशुकाट पसरला होता. मागीलवर्षी कारोनामुळे लॉकडाऊन काळात व्यापार्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहेत. यानंतर अनलॉकमध्ये नियमांना अनुसरून हळूहळू व्यापार सुरू केला. अडीअडचणींना व्यापार पूर्वपदावर व्यापार्यांचा प्रयत्न सुरू होता. तोच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यानंतर आता व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यानुसार, मागील सर्व त्रास विसरुन व्यापार्यांनी बंदमध्ये उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. प्रशासनाचे आदेश व्यापार्यांनी पाळावेत, याकरिता नागविदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसकडून बंद पाळण्याचे आवाहन केले होते. व्यापार्यांनी बंदला सहकार्य करीत प्रतिष्ठाने बंद ठेवली. केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने शहरात सुरू होती. यात औषधी, भाजी, फळ व पेट्रोलपंपासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. दुकानेच बंद असल्यामुळे नागरिकांनीही बाहेर निघण्याचे टाळले. परिणामी, शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. मात्र, यातून कोट्यवधींची उलाढाल थांबल्याचे सांगण्यात येत आहे.