कोरोना चाचणी न केल्यास गुन्हे दाखल करा - पोलीस आयुक्तांचे आदेश

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले.

बाधितांच्या संपर्कात आल्यानंतरही संपर्कातील नागरिक चाचणी करीत नाहीत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी केली का, त्याचा अहवाल काय आला, अहवाल निगेटिव्ह नसतानाही तो शहरात फिरत आहे का, याची माहिती घेण्यासह चाचणी न करणाऱ्यांविरुद्ध साथरोग कायदा व आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

'मिनी लॉकडाउन'दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह तब्बल अडीच हजार पोलिसांचा ताफा शनिवारी उपराजधानीतील रस्त्यांवर होता. शनिवारी पोलिसांनी रात्री साडेनऊपर्यंत विविध ठिकाणी ६६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ११ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.

मास्क न घालणाऱ्या २३ नागरिकांकडून सहा हजार रुपये तर सुरक्षित वावरचे पालन न करणाऱ्या ४३ नागरिकांकडून ५,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनीही मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.