हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेसला दिला घरचा अहेर

February 28,2021

अहमदाबाद : २८ फेब्रुवारी - हार्दिक पटेल म्हटलं की आपल्याला २०१५मध्ये गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनांची आठवण येते. त्या काळात हार्दिक पटेल यांनी आख्ख्या गुजरातमध्ये तुफान उठवून दिलं होतं. तुरुंगवास देखील भोगून आलेले हार्दिक पटेल २०१९मध्ये काँग्रेस पक्षात सामील झाले. त्यांना पक्षानं गुजरात काँग्रेसमध्ये पद देखील दिलं. पण आज हाच फायरब्रँड नेता गुजरात काँग्रेसमध्ये एकटा पडलाय की काय असं वाटू लागलं आहे. कारण पक्षानं गुजरातमध्ये चालवलेली धोरणं आणि निर्णयपद्धती यावर हार्दिक पटेल यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांनी आपल्याच पक्षाचे कान उपटले आहेत. विशेषत: सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दिक यांचं हे मत महत्त्वाचं ठरत आहे. याविषयी  बोलताना हार्दिक पटेल यांनी आपल्या मनातलं दु:ख बोलून दाखवलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या धोरणावर बोलताना हार्दिक पटेल यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. “गुजरातमध्ये माझे सातत्याने दौरे सुरू आहेत. पण माझा एकही दौरा गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने नियोजित केलेला नाही. मी स्वत:च सगळं करतो आहे. कारण मला पक्ष प्रबळ करायचा आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांना मला खाली खेचायचं असेल. त्यांनी ते खुशाल करावं. पण मी पुन्हा उठेन आणि कामाला लागेन”, असं ते म्हणाले आहेत. “काँग्रेसमध्ये आलो, तेव्हा वाटलं होतं पक्ष माझा चांगला वापर करून घेईल. पण तिथेही राज्यातील काँग्रेसचे प्रमुख अपयशी ठरले आहेत. मला काहीतरी जबाबदारी सोपवा. मी दिवसाला २५ सभा घ्यायलाही तयार आहे. ५०० किमीची पदयात्राही काढायला तयार आहे. पण मला काहीतरी काम द्या”, अशी खंत देखील हार्दिक यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, यावेळी बोलताना हार्दिक यांनी गुजरातमध्ये आत्तापर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांवरून देखील पक्षाला सुनावलं आहे. स्थानिकांचा मोठा विरोध असतानाही भाजपानं सर्व ६ महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला. सूरतमध्ये तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यावर हार्दिक म्हणाले, “मला जर काँग्रेस नेत्यांनी आधीच सांगितलं असतं, की सूरतमध्ये मला २५ सभा घ्यायच्या आहेत, तर आज निकाल काहीतरी वेळा लागला असता. काँग्रेस पक्षाला आत्ममंथन करण्याची गरज आहे. आपल्यातल्या कच्च्या दुव्यांवर आणि अपयशावर त्यांनी बोललं पाहिजे.”