उदयनराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

February 28,2021

मुंबई : २८ फेब्रुवारी - भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी  कृष्णकुंज येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा राजमुद्रा भेट दिली. या भेटीत मराठा आरक्षण व राज्याची सध्याची राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्येष्ठ राजकीय नेत्यांना व दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मागील आठवड्यात त्यांनी एकाच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. तर आज उदयनराजे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी राज ठाकरे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण करू नये. कोणाच्या आरक्षणावर गदा येऊ नये. इतर समाजाच्या नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील नेत्यांनाही मिळायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असेही उदयनराजेंनी राज ठाकरेंना सांगितले असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (रविवार) एक बैठक आयोजित केली आहे. त्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा झाली. उदयनराजे प्रथमच राज ठाकरे यांना भेटल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असे निकटवर्तीयांनी सांगितले. यावेळी उदयनराजें सोबत काकासाहेब धुमाळ व जितेंद्रसिंह खानविलकर आदी उपस्थित होते.