काँग्रेस पक्ष दुबळा होत चालला आहे, हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे - कपिल सिब्बल

February 28,2021

श्रीनगर : २८ फेब्रुवारी - काँग्रेस  पक्ष दुबळा होत चालला आहे, हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे. त्यामुळेच आम्ही एकत्र जमलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल  यांनी व्यक्त केले. 

ते  जम्मूत आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनात बोलत होते. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी काँग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. यापैकी काही नेते सध्या माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या निमंत्रणावरुन जम्मूत जमले आहेत. त्यामुळे या नेत्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

त्यानुसार कपिल सिब्बल यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षातील त्रुटींवर बोट ठेवले. काँग्रेस पक्ष दुबळा होत चाललाय हे आपण डोळ्यांनी पाहतोय. त्यामुळेच आम्ही आज इथे जमलो आहोत. ही गोष्ट आम्ही फार पूर्वीच करायला पाहिजे होती. आपल्याला काँग्रेसला पुन्हा बळकट करावे लागेल, असे सिब्बल यांनी म्हटले.

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झाले. काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये समावेश असल्यामुळेच गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जम्मूत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही याविषयी नाराजी व्यक्ती केली. जम्मू-काश्मीरचा एकही प्रतिनिधी राज्यसभेत नसणे ही वेळ 1950 नंतर प्रथमच आली आहे. ही चूक सुधारली पाहिजे. गेल्या दशकभरात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला. आम्ही पक्षाच्या भल्यासाठी आवाज उठवत आहोत. देशभरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बळकट झाला पाहिजे. नव्या पिढीने पक्षाशी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे. आम्ही काँग्रेसचा सुवर्णकाळ पाहिला आहे. मात्र, आता आम्हाला उतारवयात काँग्रेसची दुर्बलता पाहायची नाही, असे परखड मत आनंद शर्मा यांनी मांडले.