पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडले

February 28,2021

भंडारा : २८ फेब्रुवारी - जिल्ह्याच्या लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. हा बिबट्या खैरी/ मासळ जवळील कालव्याच्या एका पाईपमध्ये लपून बसला होता. एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला वनविभागाने त्याला शिताफीने पिंजऱ्यात पकडले. विशेष म्हणजे, या बिबट्याने एका युवकावर हल्ला करून त्याला जखमी केल्यानंतर पाईपमध्ये आश्रय घेतला होता.

खैरी/ मासळ येथील काही शेतमजूर शेतात काम करायला गेले असता, कालव्यातील पाईपमध्ये विश्रांती घेत असलेल्या बिबट्याने अचानकपणे तुळशीदास कोरे नामक युवकावर हल्ला करून त्यास जखमी केले. सोबतच्या काही लोकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान या युवकाने स्वतःची सुटका करून घेतली. मागील 15 दिवसापासून या भागात हा बिबट दिसत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक सातत्याने करीत होते.

घटनेची माहिती लाखांदूर येथील वन विभागास दिल्यावर वन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाला बोलवावे लागले. ज्या पाईपलाईनमध्ये बिबट्या लपून बसला होता, त्याची एक बाजू बंद करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला वन विभागाच्या रेस्क्यु टीमने पिंजरा लावला. अखेर एका तासांनंतर सायंकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले.

सध्या उन्हाळी धान पिकाची लागवड सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या बिबट्याचा परिसरात वावर असल्याने शेतकरी आणि शेतमजूर हे शेतावर जाण्यासाठी घाबरत असत. या बिबट्याला जेरबंद केल्यामुळे नागरिक आनंदित आहेत. वन विभागाने तत्परता दाखवीत बिबट्याला जेरबंद केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.