अमरावतीत ३२ हजार कोंबड्यांचे किलिंग ऑपरेशन सुरु

February 28,2021

अमरावती : २८ फेब्रुवारी - अमरावती शहरानजीक असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लूमूळे झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे. त्यामुळे आज या पोल्ट्री फार्मच्या १० किलोमीटर परिसरातील पोल्ट्रीमधील ३२ हजार कोंबड्यांचे किलिंग  ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे 150 कर्मचारी काम करत आहेत. त्यासाठी एकूण 32 टीम बनवल्या आहेत. एका टीममध्ये तीन कर्मचारी आणि एक प्रमुख पशुधन अधिकारी यांचा समावेश आहे.

अमरावती जिल्हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा सामना करत असतानाच आता अमरावती जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याने शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकांसह अमरावतीकरांचा चिंतेत आणखी भर पडली आहे. अमरावती शहरानजीक असलेल्या भानखेडा परिसरातील कोंबड्यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला त्यासाठी त्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्हा कोरोना आणि बर्ड फ्लू, अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. 

दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरातील पोल्ट्री फार्मवरील अनेक कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे हा परिसर संक्रमित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 32 हजार कोंबड्यांना नष्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे.