पूजा चव्हाणची चुलत आजी पोलिसात तक्रार दाखल करणार

February 28,2021

पुणे : २८ फेब्रुवारी - पूजा चव्हाण  मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. याविवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे शांताबाई राठोड त्यांच्या फिर्यादीमध्ये वनमंत्री संजय राठोड यांचेसुद्धा नाव घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करणार आहेत. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर विरोधक आडून बसले आहेत. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरसुद्धा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे सावट आल्याचे दिसते आहे. विरोधकांनी राठोडांचा राजीनामा घेत नाहीत तोर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा घेणार असल्याचे बोलले जातेय पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात यापूर्वी भाजपने पुण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पूजा चव्हाणच्या कुटुंबाशी थेट संबंध असणारी व्यक्ती म्हणजेच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड या पूजाच्या मृत्यूबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी समोर आल्या आहेत. याशिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहेत.

पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या मृत्यूबाबत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. जोपर्यंत पूजाच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस वानवडी पोलीस ठाण्यातून निघणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या फिर्यादीमध्ये त्या वनमंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने त्या पोलिसांत तक्रार दाखल करतील.