राज ठाकरेंनी मास्क ना लावल्याने त्यांना कोरोना झाला तर सरकार जबाबदार राहणार नाही - विजय वडेट्टीवार

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्याबाबत वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, राज यांनी मास्क घातलं नाही आणि त्यांना कोरोना झाल्यास सरकार जबाबदार राहणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

ईडीकडून राज्यातील नेत्यांना येत असलेल्या नोटिशीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीने राजकीय भावनेतून नोटिस बजावली असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असं ते म्हणाले. त्यामुळे ईडीकडून देण्यात येणाऱ्या नोटिसीला एसीबीच्या नोटिशीने सरकार उत्तर देणार का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडल्यानंतर ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. मग यात राजकारण नाही का? असा सवाल करतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीला एसीबीने नोटीस पाठवली आहे. पोलीस नियमानुसार कारवाई करत आहे, असंही ते म्हणाले.

अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी ठेवला आहे. तसेच वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. त्याबाबत वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, अधिवेशन चालवणे ही सरकार आणि विरोधकांचीही जबाबदारी आहे. विरोधक अधिवेशन चालू देणार नाही असं म्हणत असतील तर जनतेशी त्यांना काहीही घेणंदेणं नाही असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल, असंही ते म्हणाले.