पैशाचा पाऊस पडतो असे सांगून लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीला अटक

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषन करणार्या पाच जणांच्या एका टोळीला शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. विक्की गणेश खापरे (20) वृंदावननगर, दिनेश महादेव निखारे (25) कोरा, ता. समुंद्रपूर, रामकृष्ण दादाजी म्हसकर (41) दसोडा, ता. समुंद्रपूर, विनोद जयराम मसराम (42) जांभुळघाट, ता. चिमूर आणि डीआर उर्फ सोपान हरीभाऊ कुमरे (35) खापरी, ता. चिमूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी माहिती अशी, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे आली. त्या मुलीने राजमाने यांना सांगितले की, तिच्या मैत्रिणीच्या ओळखीचा विक्की नावाचा मुलगा असून तो त्याच्या ओळखीने जादूटोणा करणार्या डीआर उर्फ सोपान कुमरे याच्याकडे घेऊन जाणार आहे. तेथे तिला जादूटोण्याच्या तीन पातळ्या पार कराव्या लागतील. सर्वप्रथम तिला एका खोलीत पाठविल्या जाईल. तेथे तिच्या डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधून तिला नग्न करण्यात येईल. त्यानंतर सोपान हा त्या मुलीवर कुठली शस्त्रक्रिया झाली काय, कुत्रा चावला काय, अंगावर टॅटू किंवा तिळ आहे काय याची तपासणी करणार. मुलीवर शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा कुत्रा चावल्यास तिला परत पाठविण्यात येईल. पहिल्या पातळीवर मुलगी पास झाल्यास तिला दुसर्या पातळीतून जावे लागेल. त्याच खोलीत पुन्हा तिला पुर्णपणे नग्न करून तिला सर्कलमध्ये उभे करणार. त्यावेळी सोपान हा मुलीला तिला तीन रंगाचे प्रकार विचारणार की, तुला कोणता रंग दिसत आहे. सोबतच आणखी काही प्रश्न विचारण्यात येतील. तिसर्या पातळीत मुलगी पुर्णपणे नग्नावस्थेत राहणार. सोपान काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास सोपान तेथून निघून जाईल. कुणीही तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. तू घाबरू नकोस. आम्ही स्वत: विक्की, दिनेश, रामकृष्ण आणि विनोद हे देखील तेथे राहणार आहेत. तू त्याला ऐवढेच म्हण की, ‘तू आधी माझ काम कर, मग मी तुला तुझे काम करू देते’. सोपान तुला विचारेल तुला किती पैसे हवेत. त्यावर तू त्याला 50 कोटी रुपये पाहिजेत असे म्हण. सर्व झाल्यावर आपल्याला पैसे मिळणार. या आधी सुद्धा त्यांनी अनेक मुलींना पैसे मिळवून दिले असल्याचे विक्कीने मुलीला सांगितले होते. 

त्यानंतर विक्कीने या कामासाठी 50 किलो वजनाच्या आणि 5 फूट उंचीच्या मुली पाहिजेत. तू तुझे 4 ते 5 छायाचित्रे, पूर्ण नाव, उंची, वजन, मासिक पाळीची तारीख व्हॉट्सअपवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे काम करण्यासाठी विक्की हा वारंवार मुलीला फोन करून तिच्यावर दबाव आणत होता. हे काम करण्याची तिची इच्छा नसल्याने ती पोलिसांकडे आली असेही तिेने राजमाने यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजमाने यांनी हे प्रकरण सामाजिक सुरक्षा विभागाचे सार्थक नेहते यांच्याकडे हे प्रकरण सोपवून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले.