गाळेधारकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - गाळेधारकांसोबत गाळे विकण्याचा करारनामा केल्यानंतर पैसे घेऊन देखील गाळेधारकांना गाळे न देता फसवणूक केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी रविशंकर चंद्रभान गुप्ता (47) रा. पार्वतीनगर, रामेश्वरी यास अटक केली. 

रविशंकर गुप्ता हा कपड्याचा व्यापारी आहे. 2006 साली त्याने रामेश्वरी चौकात येथे गुप्ता कॉम्पलेक्स नावाने संकूल तयार केले होते. या संकूलात त्याने दुकानासाठी काही गाळे देखील काढले होते. बेसा मार्गावरील अभिजितनगर येथे राहणार्या बिहारीलाल शिवप्रसाद सोनी (45) यांनी आणि इतर सात ते आठ जणांनी गुप्ता याच्याकडून गाळे खरेदी केले होते. 

गाळे खरेदी करताना गुप्ताने करारनामा करून गाळ्यांचे पैसे घेतले होते. पैसे घेऊन देखील गुप्ताने गाळेधारकांना गाळ्यांची रजिस्ट्री करून न देता ते संकूल पत्नीच्या नावावर केले. त्याचप्रमाणे त्या संकुलाची पत्नीच्या नावे रजिस्ट्री सुद्धा केली. त्यानंतर त्या संकुलावर त्याने बँकेतून कर्ज उचलले होते. मात्र, गाळेधारकांना गाळे न देता त्यांची 20 लाख 85 हजार 940 रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी बिहारीलाल सोनी यांनी अजनी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून रविशंकर यास अटक केली.