नोकरीवरून काढल्याने सुरक्षा रक्षकांनी राष्ट्रपतींना मागितली इच्छामरणाची परवानगी

March 01,2021

गोंदिया : १ मार्च - बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांना विमानतळ प्रशासनाने नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. सुरक्षारक्षकांनी आता राष्ट्रपतींच्या नावे पत्र लिहून इच्छामृत्यूची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सुरक्षारक्षकांना नोकरीवरून काढून टाकल्याच्या विरोधात 19 जानेवारीपासून 23 सुरक्षारक्षकांचे सहकुटुंब विमानतळासमोर उपोषण आंदोलन सुरू आहे. परंतु, आतापर्यंत विमानतळ प्रशासन व जिल्हा प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या समस्येचे समाधान केले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे पत्र लिहिले आहे. 

त्या पत्रानुसार, सुरक्षारक्षकांनी 13 वर्षे काम केल्यानंतर त्यांना अचानक नोकरीतून काढण्यात आले आहे. त्यामुळे ते बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. सदर पत्राच्या प्रतिलिपी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, खा. सुनील मेंढे, आ. विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी दीपककुमार मीना व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत. हे पत्र विशाल मजूर संघाचे अध्यक्ष अनिल भेंडारकर, सतीश जगणे, पंकज वंजारी, वसंत मेश्राम, राजेश गुरुबेले, मुन्नासिंह गुरुबेले, सलीम शेख, लोकचंद मुंडेले, राकेश वंजारी, नंदकिशोर नागपुरे आदींनी पाठविले आहे.