घरात घुसून आई आणि भावासमोर केले मुलीचे अपहरण

March 01,2021

भंडारा : १ मार्च - साकोली तालुक्यातील एका गावातुन रात्री चार ते पाच इसमांनी मुलीच्या घरात प्रवेश करुन मुलीचे आई व भावासमोर अपहरण केल्याची घटना काल रात्री १ वाजताच्या दरम्यान घडली. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच पाठलाग केला. यातील दोघे पोलिसांच्या हाती लागले असून मुलगी व उर्वरीत अपहरणकर्त्याचा मात्र शोध लागला नाही. 

पोलिस सुत्रानुसार साकोली तालुक्यातील एका गावी रात्री अंधाराचा फायदा घेत नागपूर जिल्ह्यातील चार ते पाच अज्ञात आरोपींनी एका घरात प्रवेश केला व घरातील एका मुलीचे अपहरण करुन पसार झाले. अपहरण होताच मुलीच्या भावाने रात्रीच साकोली पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. तक्रार मिळताच रात्री पोलिसांनी पोलिस पथक नागपूरकडे रवाना केले. पाोलिसांनी पाठलाग करीत दोन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले असून या अपहरणात वारण्यात आलेली गाडीही ताब्यात घेतली मात्र अपहरण झालेली मुलीचा अद्याप पर्यंत शोध लागला नाही. साकोली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत व कर्मचारी करीत आहेत.