वर्ध्यातील अग्निपीडितांना भेटण्यासाठी पालकमंत्र्यांनी घेतली धाव

March 01,2021

वर्धा : १ मार्च - आग लागल्याची माहिती मिळाली तेव्हा आपण मुंबईत होतो. उद्यापासून अधिवेशन असल्याने सायंकाळी कॅडरच्या बैठकी आटोपल्या. अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न विचारण्यापूर्वी पूर्ण माहिती असावी यासाठी ताबडतोब आलो. आता पीडितांना तात्काळ मदत कशी करता येईल, हीच आपली प्राथमिकता असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले.वर्धेत काल २८ रोजी सकाळी ९ वाजता गोलबाजारातील टिळक मार्केट मधील भाजी व फळांची 45 दुकानं जळून खाक झाली यात जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री केदार यांनी खास वर्धेतील आगीची पाहणी करण्यासाठी काल रात्री ११ वाजता भेट दिली. 

नुकसानग्रस्त भाजी व फळ विक्रेत्यांसोबत थेट बोलून प्रत्येक दुकानाची पाहणी केली. आपदग्रस्त दुकानदार प्रफुल भोयर यांनी आम्हला वीज आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्या. आमचे पोट याच व्यवसायावर आहे अशी विनंती केली. काही लोकांनी गोलबाजाराचे बांधकाम विषय उपस्थित केला असता माझी प्राथमिकता आधी पीडितांना मदतीची आहे, बांधकाम नंतर बघू असे ते म्हणाले.यावेळी काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधीक्षक होळकर, उपविभागीय अधिकारी बगळे, नपचे मुख्याधिकारी पालिवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप आदींची उपस्थिती होती.