पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय खरे काय खोटे ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे - देवेंद्र फडणवीस

March 01,2021

मुंबई : १ मार्च - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं ते खरं की खोटं? माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या क्लिप्स खऱ्या की खोट्या?,' याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं,' अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

विधानभवनाच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल विरोधी पक्षावर जोरदार टीका केली होती. त्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला. 'संजय राठोड यांच्या संदर्भातील प्रश्नांना उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी झाली होती. सगळे पुरावे असताना जणू काही घडलंच नाही, असं जेव्हा सांगावं लागतं, त्यावेळी नैतिक धैर्य साथ देत नाही. मास्क असतानाही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं,' असा खोचक टोमणा फडणवीस यांनी हाणला. 'यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं ते खरं की खोटं? क्लिप्स खऱ्या की खोट्या?, अशी विचारणा करतानाच, 'तुम्हाला कोणाला साधू संत ठरवायचं असेल तर ठरवा, पण मग तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं,' असंही फडणवीस म्हणाले.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीच्या संदर्भातही फडणवीस यांनी भूमिका मांडली. 'सुसाइड नोट मिळाल्यावर पोलीस चौकशी होतेच, ती व्हायलाच हवी. खरंतर डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचं नाव नाही. त्यामुळंच नावं जाहीर केली जात नाहीत,' असा दावाही फडणवीस यांनी केला.