गणराज्यदिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात भाजपचा हात - अरविंद केजरीवाल

March 01,2021

लखनऊ : १ मार्च  - 26 जानेवारी 'प्रजासत्ताक दिनी' शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारामागे भाजपचा हात होता, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  केला. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सभेत ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. 

लाल किल्ल्याची संपूर्ण घटना भाजपाकडून आखली गेली होती. लाल किल्ल्यांवर ज्यांनी ध्वजारोहण केले. ते त्यांचे (भाजपा) कार्यकर्ते होते. शेतकरी देशद्रोही नाहीत. केंद्र सरकारने देशविरोधी कारवाया केल्याबद्दल शेतकऱयांवर गुन्हे दाखल केले आहेत. ब्रिटिशांनासुद्धा हे धैर्य नव्हते, असे केजरीवाल म्हणाले. 

केंद्राचे तीन कृषी कायदे हे शेतकर्यांसाठी डेथ वॉरंट आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून तीन ते चार भांडवलदारांना देण्याची सरकारची इच्छा आहे. अगदी ब्रिटिशांनीही शेतकर्यांवर या प्रमाणात अत्याचार केले नाहीत. या सरकारने ब्रिटिशांना मागे सोडले आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. 

शेतकऱ्यांना तरुंगात डांबण्यासाठी त्यांनी माझ्याकडे तुरुंग बनविण्यासाठी फाईल पाठवल्या. आम्ही नकार दिल्यानंतर त्यांनी फाईल क्लियर करण्याची धमकी दिली. मात्र, आम्ही झुकलो नाही. जेव्हापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आम्ही मनापासून त्यांची सेवा करत आहोत, असे केजरीवाल म्हणाले.