संजय राठोड यांचा राजीनामा घेणे हा बंजारा समाजावर अन्याय - महंतांची टीका

March 01,2021

वाशिम : १ मार्च - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेणे म्हणजे बंजारा समाजावर अन्याय आहे. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा घेणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया पोहरादेवी येथील धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.

जितेंद्र महाराज म्हणाले की, बंजारा समाजाचे धर्मपीठ संजय राठोड यांच्या पाठीशी असून, कोरोना संपल्यावर आम्ही मोठी बैठक घेणार आहोत. त्या बैठकीत या प्रकरणी बंजारा समाजाच्या वतीने समाजाची पुढची भूमिका काय असणार हे ठरवणार आहोत. शिवाय संजय राठोड पोहरादेवी येथे येणार का नाही, यासंदर्भात नक्की माहिती नसल्याचेही यावेळी बोलताना जितेंद्र महाराज यांनी सांगितले.

पूजा चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू, त्या प्रकरणावरून संजय राठोड यांचा घेण्यात आलेला राजीनामा या दोन्ही अतिशय वाईट घटना घडल्या आहेत. संजय राठोड यांच्यावर चौकशी न करता अत्यंत खालच्या स्तरावर टीका झाली. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे, असेही यावेळी महंत म्हणाले. 

या प्रकरणात धर्मपीठ म्हणून आम्ही सत्य आणि न्यायाच्या पाठिशी आहोत. न्यायप्रक्रियेने निपक्षपणे या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल जनतेसमोर आणावा, असे आवाहन धर्मपीठाकडून करण्यात आले. या माध्यमातून बंजारा समाज आणि संजय राठोड यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय द्यावा, असे आवाहनही महंत जितेंद्र महाराज यांनी यावेळी केले आहे.