बुटीबोरी एमआयडीसीत औषध निर्माण कंपनीला आग

March 01,2021

नागपूर : १ मार्च - विदर्भात औषधांचा पुरवठा करणाऱ्या स्नेहा फार्मसिटीकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरात ही कंपनी आहे. याबाबत माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

विदर्भाच्या फार्मसिटीकल क्षेत्रात स्नेहा फार्मसिटीकल या कंपनीचे नाव मोठे समजले जाते. संपूर्ण विदर्भातील आणि शेजारच्या राज्यातील काही जिल्ह्यांनासुद्धा स्नेहा फार्मसिटीकल कंपनीच्या माध्यमातून औषधांचा पुरवठा केला जातो. आज (सोमवारी) सकाळी कंपनीच्या बाहेरील भागात ठेवण्यात आलेल्या काही वस्तुंना आग लागली. ज्या भागात आग लागली त्या ठिकाणी औषधांमध्ये उपयोगात येणारे रसायन ठेवण्यात आले होते. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचोस्तोपर्यंत आगीने संपूर्ण इमारतीला कवेत घेतले होते. सुमारे एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.