कंगना राणावत विरुद्ध जामीनपात्र वारंट

March 01,2021

मुंबई : १ मार्च - प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात अंधेरी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी अंधेरी कोर्टाने कंगना रणौतविरूद्ध जामीन वॉरंट जारी केले आहे.

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला आहे. एका वर्षापूर्वी जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हृतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे आहेत, जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल," अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणौतने केला होता. कंगनाच्या या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

कंगनाच्या नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन बराच वाद झाला. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी यावर तिने सतत टीका केली. त्यानंतर तिने महाराष्ट्र सरकारशीही पंगा घेतला. मुंबईची तुलना पीओकेशी करुन तिने नवा वाद ओढवून घेतला. तिच्या मुंबईच्या ऑफिसवर बीएमसीने हातोडा चालवल्यावर ती आणखीनच आक्रमक झाली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरीवर करण्यापर्यंत तिची मजल गेली. वर्ष अखेरीस तिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही काही वादग्रस्त ट्विट केले होते.