सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटून बाप-लेकांचा मृत्यू

March 01,2021

सोलापूर : १ मार्च - सोलापूच्या अकलूज येथील बाप लेकाचा मृत्यू झाल्याची एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. वांगी-३ परिसरात उजनी जलाशयात बोटीनं जात असताना सेल्फी  काढताना बोट उलटल्यानं 39 वर्षीय व्यक्तीचा आणि त्यांच्या मुलाचा  मृत्यू झाला आहे. सुदैवानं या घटनेत मृताची पत्नी आणि मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.

रविवारी विकास गोपाळ शेंडगे (वय ३९) हे आपली पत्नी स्वाती विकास शेंडगे (वय ३०), मुलगा जय विकास शेंडगे (वय १३) आणि मुलगी अंजली विकास शेंडगे (वय-९) यांच्यासोबत करमाळा तालुक्यातील केम येथे लग्न समारंभासाठी नातेवाईकांकडे गेले होते. यानंतर ते सर्व वांगी नं 3 येथे जयवंत सातव या मित्राकडे गेले होते.

रविवारी संध्याकाळी त्यांना बोटीतून फिरण्याची इच्छा झाल्यानं उजनी जलाशयात मासेमारीसाठी असलेल्या बोटीतून ते फिरण्यासाठी गेले. मात्र, खोल पाण्यात गेल्यावर सेल्फी काढत असतानाच बोट उलटली. यानंतर बोटीमधील सर्वजण पाण्यात बुडाले. यात विकास शेंडगे  आणि त्यांच्या मुलगा अजिंक्य याचा बुडून मृत्यू झाला. तर, मुलगी अंजली शेंडगे, स्वाती शेंडगे विकास यांचे मित्र जयवंत सातव आणि त्यांचा मुलगा या सर्वांना वाचवण्यात यश आलं. दरम्यान, स्वाती आणि अंजली यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेबाबत रात्री उशिपर्यंत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. लग्नासाठी आलेल्या कुटुंबीयांवर ओढावलेल्या या घटनेमुळे अकलूज आणि केम येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.