नागपुरातही आजपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाला सुरूवात

March 01,2021

नागपूर : १ मार्च - आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 वर्षांवरील नागरिक ज्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. अशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. आज सकाळी नऊ वाजल्यापासून लसीकरणाची मोहीम सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तब्बल तीन तासाच्या उशिराने लसीकरण सुरू झाले आहे. सकाळी अनेकांना लस न घेता घरी परत जावे लागले होते. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्याकरिता गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी लस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन स्वतःला लस टोचून घेतली. त्यानंतर संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे नागपुरात मोहीम सुरू होण्यापूर्वी त्याला ब्रेक लागला होता. मात्र, आता सर्व यंत्रणा सुरळीत सुरू झाली आहे. आरोग्यसेवक आणि फ्रन्टलाइन वर्कर यांच्यासाठी नियमित लसीकरण सुरू असताना आजपासून ज्येष्ठ नागरिकांसाठीही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसोबतच गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली जात आहे. तिसऱ्या टप्यातील पहिल्या स्टेजमध्ये नागपूर येथे 11 ठिकाणी लसीकरण केले जात आहे. यामध्ये पाचपवली येथे दोन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दोन केंद्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे देखील दोन केंद्र, झिंगाबाई टाकळी येथील पोलीस रुग्णालयात एक केंद्र, गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात एक केंद्र, इमामवडा येथील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये एक केंद्र, एम्स हॉस्पिटल, एसआयसी हॉस्पिटल या केंद्रांवर जाऊन नागरिक लसीकरण करता येणार आहे.

आजपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर येथील ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र, ऐनवेळी तांत्रिक अडचण झाल्यामुळे ज्येष्ठांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे बघायला मिळाले. आज सकाळी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र, त्यांना लस न घेताच परत जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचा संताप झाला. मात्र, उशिरा का होई ना, पहिल्याच दिवशी लस मिळाल्याचा आनंद जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.