प्रियांका गांधींनी आसामात घेतले कामाख्या देवीचे दर्शन

March 01,2021

गुवाहाटी : १ मार्च - आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आसाम जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या आसामच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी गुवाहाटीत कामाख्या देवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि आदिवासी नृत्यावर तालही धरला. 

प्रियांका गांधी या आज सकाळीच गुवाहाटी येथे आल्या आहेत. दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी त्या आसामला आल्या आहेत. आज सकाळी गुवाहाटी येथे आल्यावर त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली. त्यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्यावर ठेकाही धरला. या प्रसंगी पारंपारिक ढोल वाजवण्यात आला होता. गोल गोल फिरत प्रियांका गांधी यांनी नृत्य केलं. यावेळी आदिवासी महिलांनी एक सारखा पोशाख परिधान केला होता. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लखमीपूर येथे प्रियांका गांधी यांनी रोजगार अभियानासही सुरुवात केली. तरुणांना रोजागार मिळावा म्हणून काँग्रेसकडून आसाममध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर येत्या काळात काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर सोनिया गांधी यांनी ट्विट केलं आहे. आज कामाख्या देवीचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं. देशावासियांच्या कल्याणासाठी देवीकडे प्रार्थना केली, असं प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या दोन दिवसाच्या दौऱ्यात प्रियांका गांधी अनेक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. कार्यकर्त्यांसोबतही संवाद साधणार आहेत. त्यानंतर उद्या मंगळवारी तेजपूरमध्ये एका महारॅलीलाही त्या संबोधित करणार आहेत. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. मात्र त्या आसामसह पाचही राज्यांच्या स्टार कॅम्पेनर असणार आहेत. आसामसह पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या राज्यांमध्येही त्या प्रचारासाठी जाणार आहेत.