पूजाच्या हत्येचे आरोपीचं माझीही हत्या करतील - पूजाच्या चुलत आजीने व्यक्त केली भीती

March 01,2021

पुणे : १ मार्च - पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी 'माझी हत्या होणार आहे, जे या प्रकरणातील आरोपी आहे तेच माझी हत्या करतील', असा गंभीर दावा केला आहे.

शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात भेटीसाठी आल्या होत्या. पण यावेळी पोलीस उप आयुक्तांची भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे.

'माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे.  मुख्यमंत्र्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे.  संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे', असा दावा शांताबाई राठोड यांनी केला आहे.

'मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परळीला गेल्यानंतर तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला काही धोका झाला किंवा मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही, अशा आरोपींची नावं मी तृप्ती देसाई यांच्याकडे दिली आहे', असंही शांता राठोड म्हणाल्या.

'पाच कोटी रुपये दिलेले आहे म्हणून तिच्या आई वडिलांचे तोंड बंद झाले आहे. पूजाचे आणि माझे चांगले रिलेशन होते. परळीतील सीसीटीव्ही मिळावं यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्याचा या प्रकरणात कोणताही संबंध नाही. जर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाहीतर मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे, असंही शांताबाई राठोड यांनी सांगितलं.

पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न म्हणून तृप्ती देसाई यांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक लगड यांना कारवाई करायची नाही, सामान्य माणसावर लवकर कारवाई होते. पण या प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नाही.