दोन तोतया पोलिसांना केली अटक

March 01,2021

अकोला : १ मार्च - मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम भागात पोलिस असल्याचे भासवून मोटरसायकलस्वारांना तसेच नागरिकांना अडवून पैसे वसूल करणार्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे.या दोघा भामट्यांच्या अटकेने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मूर्तिजापूर येथील रोशनपुरा भागातील रहिवासी समीर खान आसिफ खान याने दिलेल्या तक्रारीनुसार, समीर हा त्याच्या मित्रांसह भातकुलीमार्गे अमरावतीला दुचाकीने जात होते. 

हिवरा कोरडे फाट्यासमोर सोमवार, 22 फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण साहेबराव बुरघाटे, मंगेश उत्तमराव बुरघाटे या दोघांनी समीर खानला थांबवून आम्ही पोलिस आहोत तुझे लायसन्स दाखव, असे म्हटले. त्यावेळी लायसन्स नसल्यामुळे त्या नकली पोलिसांनी आम्ही तुझे चालान फाडतो, म्हणून सांगितले. यावेळी तक्रारदाराने तोतया पोलिसांना 100 रुपये देऊन अमरावती गाठली.नंतर ते अमरावतीहून लग्नाचा बस्ता घेऊन परत येत असता सायंकाळी 6 वाजता दरम्यान याच नकली पोलिसांनी पुन्हा तक्रारीदाराशी  त्याच ठिकाणी थांबवून लायसन्स दाखव म्हणून सांगितले. 

यावेळी दोघेही आरोपी दारू प्यायले होते. यावेळी समीर खानने त्या नकली पोलिसांना ओळखपत्र दाखवा असे म्हंटले असता आपले बिंग फुटेल म्हणून तोतया पोलिसांनी हुज्जत घातली.याप्रकरणात 27 फेब्रुवारीला दिलेल्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी दोन्ही आरोपी श्रीकृष्ण बुरघाटे, मंगेश बुरघाटे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला व दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, मूर्तिजापूर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे याप्रकरणी अधिक तपास माना स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.