सरपण गोळा करणाऱ्या व्यक्तीवर वाघाने केला हल्ला, घटनास्थळीच ठार

March 01,2021

चंद्रपूर : १ मार्च - सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. यात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. रामजी कोंडेकर, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

नागभिड तहसील अंतर्गत येणाऱ्या तळोधी वनपरिक्षेत्र येथील गोविंदपूर क्षेत्रात येणाऱ्या कोसंबी येथील वासुदेव रामजी कोंडेकर (वय ५५ वर्ष) हे सकाळी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. मोरी उचलून नेत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात कोंडेकर जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली.

वनरक्षक गौरकर यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. वन विभागाने तातडीने नागभिड येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल केला. शवविच्छेदन करून मृतकाच्या नातेवाईकाला अंत्यविधीसाठी २० हजार रुपये देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचल्यावर शासकीय नियमांच्या अधिनस्त राहून पुढील कार्यवाही करण्यात येईल, तसचे शासकीय मदत देण्यात येईल, असे सांगितले. कोंडेकर यांच्या पश्चात पत्नी सुशीला कोंडेकर आणि मुलगा, असा परिवार आहे.