अमरावती विमानतळासाठी साडेसहा कोटींचा निधी मिळणार

March 03,2021

अमरावती : ३ मार्च - अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, अमरावती विमानतळासाठी 6 कोटी 45 लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झाला आहे. 

जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्या अमरावती विमानतळाच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला निधी वितरित करण्यात येतो. त्यानुसार राज्य शासनाकडून 2020-21 या वर्षात विविध विमानतळांसाठी 128 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. त्यात अमरावती विमानतळासाठी सव्वा दोन कोटी रूपये निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला. तथापि, विमानतळाची विविध कामे पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री पवार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. विमानतळाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक 2021-22 मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती पालकमंत्री ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार शासनाकडून निधी वितरित करण्यात आला आहे. 

अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे होत आहे. विमानतळाचा अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी व येथील व्यापार- व्यवसाय, उद्योगवाढीच्या दृष्टीने लाभ होणार आहे. शासनाकडून प्राधिकरणाला निधी प्राप्त झाल्याने आता धावपट्टी, संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशाम यांनी सांगितले.