ट्रकचालकाला मारहाण करून ट्रकमधील साडेबारा लाखाचा माल पळवला, ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

March 03,2021

गोंदिया : ३ मार्च - रायपूर येथून लोखंडी सळाखी घेवून जात असलेल्या ट्रकचा पाठलाग करुन एका पांढर्या रंगाच्या कारमध्ये ८ आरोपींनी अडविले. दरम्यान ट्रक चालकास जबर मारहाण करून ट्रकसह त्याला नागभिडकडे पळविले. दरम्यान ट्रकमधील १२ लाख ४५ हजार ६३३ रूपयाचा माल लंपास करून चालकाला ट्रकसह नागभिड मार्गावर सोडून दिले. या प्रकरणी देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, नागपूर येथील फिर्यादी ट्रक चालक प्रविण रामभाऊ दांडे हा रायपूर येथून ट्रक क्र.सीजी-0७/सीए-३४00 मध्ये २५ टन लोखंडी सळाखी (किंमत १२ लाख ४५ हजार ६३६ रुपए ) भरून जात होता. या ट्रकचा पांढरा रंगाच्या कारने जवळपास ८ आरोपींनी पाठलाग केला. दरम्यान ट्रकला अडवून आरोपी ट्रक चालक प्रविण याला कॅबीनमध्ये जबर मारहाण केली. तसेच दोरीने त्याचे हातपाय बांधून व डोळ्यावर कापड बांधून ट्रक नागभिडकडे पळवून नेला. त्यातच ट्रकमध्ये भरलेल्या सळाखी लंपास करून चालकास ट्रकसह नागभिड ते नागपूर मार्गावरील नवखेडा गावशिवारात सोडून दिले. या प्रकरणी फियार्दी ट्रक चालकाच्या तक्रारीवरून देवरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.