घटस्फोटानंतर सज्ञान मुलाला पोटगी देणे अनिवार्य नाही - उच्च न्यायालय

March 03,2021

नागपूर : ३ मार्च -  घटस्फोटानंतर पतीने पत्नीला पोटगी देणे अपेक्षित आहे. मात्र घटस्फोटानंतर सज्ञान झालेल्या मुलासाठीही त्याने पोटगी देणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

या प्रकरणातील घटस्फोटित दाम्पत्याचा १९९७ साली विवाह झाला. पुढे १९९९ साली त्यांना मुलगा झाला. दोघांमध्ये वाद विवाद वाढू लागले. अखेर त्यांचा काडीमोड झाला. त्यांचा मुलगा अल्पवयीन होता. न्यायालयाने पत्नीसाठी ३५०० तर मुलासाठी १५०० असे एकूण पाच हजार रुपयांची दरमहा पोटगी देण्याचे आदेश दिले होते. पतीने ही पोटगी देणे सुरू केले. पुढे त्यात वाढ झाली आणि पोटगी १५ हजार रुपयांपर्यंत गेली. आता पत्नीने परत एकदा उच्च न्यायालयात धाव घेत पोटगी वाढविण्याची मागणी केली. आता तिचा मुलगा २१ वर्षांचा असून सज्ञान आहे. त्याच्यासाठीही पतीने पोटगी देणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.