आसाममध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास सीएए कायदा रद्द करू - प्रियांका गांधी

March 03,2021

गुवाहाटी : ३ मार्च - आसाममध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) रद्द करणारा नवा कायदा राज्यात आणला जाईल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

तेजपूर येथे सभेत गांधी-वढेरा यांनी ‘पाच हमी’ प्रचाराची सुरुवात केली. आसाममध्ये आपल्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली तर राज्यातील गृहिणींना दरमहा दोन हजार रुपयांची मदत दिली जाईल आणि सर्व घरगुती वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असे त्या म्हणाल्या.

आसाममध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी, चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचे दैनंदिन वेतन १६७ वरून ३६५ रुपये करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे २५ हजार युवकांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. आसाममधील जनतेची एका पक्षाने २५ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन देऊन पाच वर्षांपूर्वी फसवणूक केली आणि त्यांना नोकऱ्यांऐवजी सीएए दिला, असेही त्या म्हणाल्या.