आणीबाणी लावणे चुकीचेच पण काँग्रेसने घटनात्मक चौकट मोडली नाही - राहुल गांधी

March 03,2021

नवी दिल्ली : ३ मार्च - आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. “काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली.

“मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती.  याआधी २०१९ लोकसभा निवडणुकीतदेखील राहुल गांधींनी एका मुलाखतीत आणीबाणी चुकीची होती सांगत माफी मागितली होती. तर २४ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील एका रॅलीत इंदिरा गांधी यांनी जाहीरपणे माफी मागितली होती.

“देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. भारतात त्या स्वातंत्र्यावरच हल्ला केला जात आहे. आरएसएस नावाची एक मोठी संस्था इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश करत आहे. हल्ला होत नाही अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्दतशीरपणे सुरु आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

“न्यायव्यवस्था, प्रेस, प्रशासकीय सेवा, निवडणूक आयोग…प्रत्येक संस्थेत अत्यंत पद्दतशीरपणे एक विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या आणि एका ठराविक संस्थेच्या लोकांनी भरली जात आहे,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.