पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करीत भाजप नेत्यांविरुद्ध पोलिसात तक्रारी

March 03,2021

वाशीम : ३ फेब्रुवारी - राज्यात मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता भाजपा नेत्यांविरुद्ध पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सात नेत्यांविरुद्ध वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात  तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, आशिष शेलार, शांता चव्हाण यांच्यासह माध्यमावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजपा नेते आणि माध्यम रोज बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे तक्रारकर्ते श्याम राठोड यांनी सांगितले. दुसरी तक्रार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा सचिव नेमीचंद भासू चव्हाण यांनी वाशीम शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

काही वृत्तवाहित्यांकडून बदनामीचे प्रकार होत आहेत. या प्रकरणात मुलगी, तिचे कुटुंबीय व संपूर्ण समाजाची मानहानी झाली. त्यामुळे भाजपा नेत्यांसह प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.