पट्रोल चोरीसाठी पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली

March 03,2021

सातारा : ३ मार्च - सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान साताऱ्यातील सासवड (ता फलटण) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

मात्र पाइपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाहून गेलं. लाखो रुपयांचं हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. तसंच जमिनीत मुरलेल्या प्रेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाल्याचं दिसून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

या भागातील लोकांनी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. मात्र कोणीही मोठा अधिकारी आपल्याला अद्याप भेटण्यासाठी आला नसल्याचं लोक सांगत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.