नागपुरातील समता प्रतिष्ठानच्या गैरव्यवहाराशी संबंधित अधिकाऱ्यांना केले निलंबित

March 03,2021

मुंबई : ३ फेब्रुवारी - बार्टी’च्या अधीनस्थ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आज विधानसभा सभागृहातही उमटल्याचं पाहायला मिळालं. या गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी धनजंय मुंडे यांना कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं उघडं करा व त्यांच्यावर आजच्या आज कारवाई करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उचलून धरली होती.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहेत. तसंच, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या संस्थांतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणाही मुंडे यांनी केली आहे.