मुंबईत तीन बॉलिवूड अभिनेत्यांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

March 03,2021

मुंबई : ३ मार्च - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ,अनुराग कश्यप व विकास बहलच्या घरी आयकर विभागाच्या पथकाकडून धाडी मारण्यात आल्या आहेत. या तिघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयावरही छापेमारी सुरू असल्याची माहिती आयकर खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिग्दर्शक ,अनुराग कश्यप , विकास बहल यांच्या मुंबईतील कार्यालय व घरावर आयकर खात्याकडून बुधवारी छापेमारी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म संबंधात ही छापेमारी करण्यात आलेली असून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म कडून मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स ची चोरी करण्यात आलेला असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. मुंबईतील शास्त्री नगर जोगेश्वरी येथे फँटम फिल्म चे कार्यालय असून , गोरेगाव परिसरामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही राहत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली असल्याचेही आयकर सूत्रांकडून कळत आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर सतर्क असून अभिनेत्री कंगना राणावत हिच्या सोबत शाब्दिक युद्ध या दोघांचं झालेला असल्याचा बराच वेळा आढळून आलेल आहे. या बरोबरच तापसी पन्नू हीसुद्धा तिच्या सोशल माध्यमांवरील अकाऊंटवर सतर्क असून देशात घडणाऱ्या विविध विषयांवर या दोघांकडून त्यांचे विचार मांडले जात आहेत.

केंद्र सरकार सूडाच्या भावनेनं काम करत आहे. त्यामुळे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकले आहेत असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांची गळचेपी हे सरकार करत आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.